निवडणूकीतील उमेदवाराचा खंदा कार्यकर्ता खून प्रकरणात गजाआड,चिखलगांव परिसरात घडला होता थरार

वणीः- सध्या सुरू असलेल्या विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवाराचा खंदा कार्यकर्ता आणि त्याचे दोन साथीदारांना खून प्रकरणात पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. परिणामी ऐन निवडणूकीच्या तोंडावर हा चिखलगांव परिसरात थरार घडल्याने चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.
    निवडणूकीच्या रणधूमाळीला नुकतीच सुरूवात झाली आहे. उमेदवारांचा प्रचार सुध्दा सुरू झाला आहे. पाच वर्षात तिनदा पक्ष बदल करणा-या उमेदवाराचा खंदा कार्यकर्ता तसेच निवडणूकीची  जबाबदारी पार पाडणारा, नेत्याच्या भूमिकेत असलेला बोधेनगर चिखलगांव येथील स्वप्नील किर्तीमंत धुर्वे 32, ज्ञानदिप उर्फ सोनू शुध्दोधन निमसटकर 29, व संदेश उर्फ संद्या प्रशांत तिखट 22 यांनी गुरूवारी बोधेनगर परिसरातील दुर्गा विसर्जन आटोपल्या नंतर श्रीकांत अरविंद ठाकरे 36 रा.मेघदूत काॅलनी चिखलगांव या मित्राचा बुधवारचे रात्रीचे सुमारास लाकडी दांडा डोक्यावर मारून खून केला असल्याची तक्रार देण्यात आली आहे.. प्रसंगी या खूनाच्या घटनेला  अपघाताचे स्वरूप देण्यासाठी श्रीकांतचा मृतदेह दूरवर नेवून टाकला होता. तर घटना स्थळापासून दिड किलोमिटर अंतरावर असलेल्या बायपास रोडवरील आर आर धाब्यासमोरील रस्त्याच्या कडेला श्रीकांतची दुचाकी नेवून टाकली होती. यातील आरोपींनीच श्रीकांतचा मृतदेह ग्रामिण रूग्णालयात नेला व अपघात झाला असल्याची नोंद सुध्दा करण्यात आली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनेचे गांभिर्य लक्षात घेवून तपास कार्याला सुरूवात केली होती. अवघ्या काही तासातच ज्ञानदिप निमसटकर, व संदेश तिखट या दोघांना पोलीसांनी चैकशीसाठी ताब्यात घेतले होते. अधीक तपास केला असता सध्या निवडणूकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवाराचा खंदा समर्थक या थरारात सहभागी असल्याचे स्पष्ट होताच जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार, अप्पर जिल्हा पोलीव अधिक्षक नुरूल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशिलकुमार नायक यांचे मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, सहायक पोलीस निरीक्षक मुर्लीधर गाडामोडे, सहायक पोलीस निरीक्षक निखील फटींग, सहायक पोलीस निरीक्षक चाटसे मॅडम, डिबी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, डिबी पथकाचे कर्मचारी, उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे पोलीस पथक यांनी तपास कामाला गती देत स्वप्नील धुर्वे याला ताब्यात घेवून अटक केली आहे. या घटनेची तक्रार मृतकाचा मामेभाऊ हितेश सुधाकर राऊत यांनी पोलीसात तक्रार दिल्यावरून सोनू निमसटकर, संदेश तिखट, व स्वप्नील धुर्वे विरूध्द भादंवि कलम 302,201, 34 नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. सदर वाद कोणत्या कारणाने झाला हे अद्याप अस्पष्ट असले तरी या खूनामागे नेमके कोणते कारण आहे. सदर थरार राजकीय वादातून घडला की काय? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. तूर्तास मित्राचा खून करून पुरावा नष्ट करण्याचा बेत आखून तयार केलेल्या योजनेचा पोलीसांनी अवघ्या काही तासातच छळा लावला हे कौतूकास्पद आहे.

Post a Comment

0 Comments