वणीतील रस्त्यांची दुरवस्था.......शाळकरी वाहने आणि रुग्णवाहिकेला ठरतेय अडचण...

वणीतील रस्त्यांची दुरवस्था.......
शाळकरी वाहने आणि रुग्णवाहिकेला ठरतेय अडचण...
वणी:- स्वच्छ वणी सुंदर वणी अशी फलके शहरात लावण्यात आली असतांना इकडे पाणी पुरवठा करण्यासाठी रस्त्यात खोदकाम करण्यात आले आहे. मात्र खोदकाम केलेले खड्डे व्यवस्थित न बुजविल्याने ग्रामीण रुग्णालयात व शाळेत जाणाऱ्या वाहनांना कमालीची अडचण निर्माण झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

वणी शहर स्वच्छ आणि सुंदर शहर असे ब्रीद लावून फलके झळकविण्यात आली आहेत. बहुदा हे केवळ जाहिरात करण्यासाठीच असावे असे दिसते आहे. शहरात ठिकठिकाणी पाणी पुरवठा करणारी वाहिनी जोडण्यासाठी नाली खोदकाम करण्यात आले आहे.सदर काम करणाऱ्या कंत्राटदाराने लवकर काम पूर्ण करण्यासाठी खोदकाम केले आहे मात्र खोदलेले खड्डे जसेच्या तसे ठेवल्याने रस्त्याने जाणारी वाहने,शाळकरी वाहने ,रुग्णवाहिका आदींना कमालीची कसरत करावी लागते आहे. ऐन ग्रामीण रुग्णालयाकडे जाणाऱ्या रस्त्यावर जणू बांध टाकल्याचे दिसायला लागले आहे. रुग्णाला रुग्णवाहिकेत न्यायचे झाले तर जावे कसे असा प्रश्न चालकाला पडणार अशी गत या रस्त्यांची आहे. शहरातील प्रथम नागरिक याच परिसरातील आहेत. अगदी त्यांच्या घराशेजारीच रस्त्याची वाताहत झाल्याने नेटकऱ्यांनी चांगलेच तोंडसुख घेतले आहे. शहरातील कित्येक ठिकाणी अशीच अवस्था असल्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या खड्यांमुळे अपघात होण्याची भीती सामान्य व्यक्त करतांना दिसते आहे.

Post a Comment

0 Comments