ग्रामीण रुग्णालयातील बहुतांश कक्ष मोकाटच.......

ग्रामीण रुग्णालयातील कर्मचारी मोकाटच........वणी:- ग्रामीण रुग्णालयातील क्ष-किरण विभाग, एचआयव्ही नियंत्रण कक्ष आदी विभागात कार्यरत असलेले कर्मचारी कक्षात बसत नसल्याने हे कर्मचारी मोकाटच असल्याचे चित्र दिसायला लागले आहे. येथील प्रशासनाचे पाठबळ मिळत असल्याने मलेरिया, क्ष-किरण आणि आयसिटीसी आदी विभागातील कर्मचारी जणू सैराट सुटले आहेत. 
    गेल्या कित्येक दिवसापासून वणी ग्रामीण रुग्णालयातील क्ष-किरण विभाग बंद आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ रजेवर, मलेरिया पर्यवेक्षक प्रमाणपत्र देण्यात व्यस्त आणि डॉक्टरांची कमतरता आदी समस्या येथे डोके काढून आहेत. परिणामी येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो आहे. आयसिटीसी विभागातील समुपदेशक तर पूर्णवेळ दिसतच नाही. अत्यंत महत्वाचा आणि संवेदनशील विभाग असतांना येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपलब्ध नाहीत. आणि दोन समुपदेशक असतांना आळीपाळीने ते काम करतांना दिसत आहे. या विभागात शासनाचा भरपूर प्रमाणात निधी येतो मात्र येथील समुपदेशक इतर लोकांच्या कार्यक्रमात सहभागी होऊन तेथील फोटो काढून शासनाला सादर करतांना दिसते आहे.परिणामी शासकीय निधी थेट यांच्या घशात जात असल्याचे आरोप होतांना दिसत आहे.  शाळांमध्ये होणारे स्नेहभोजन, लग्नसोहळा आदी ठिकाणी जाऊन समुपदेशक तेथे जाऊन उभे राहतात आणि फोटो काढून शासनाला कार्यक्रम आयोजित केल्याचे भासवतात. इतकेच नव्हे आळीपाळीने या कक्षात काम करणारे पूर्णवेळ कक्षात नसतात. गावात,प्राथमिक आरोग्य केंद्रात भेटी देतांना कधी दिसलेच नाही. केवळ शासकीय गलेलठ्ठ पगार घेऊन जणू शासनाची दिशाभूल करण्यात येथील कर्मचारी अव्वल स्थानी असल्याचे दिसून येत आहे. येथे लावण्यात आलेली हजेरी यंत्र(बायोमेट्रिक मशीन) केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. कोणत्याही गावात कार्यरत असलेला कर्मचारी वणीच्या रुग्णालयात येऊन ठसा उमटवून जातांना दिसतो आहे. तसेच येथे कार्यरत असलेले कर्मचारी दुसऱ्या तालुक्याच्या ठिकाणावरून हजेरी लावत असल्याचे दिसत आहे. एकूणच शासनाची शुद्ध दिशाभूल करीत येथील कर्मचारी मोकाट असल्याने वणी ग्रामीण रुग्णालयाचा कारभार ढेपळला आहे.

ग्रामीण रुग्णालयातील बालरोगतज्ञांचा राजीनामा
येथील ढेपळलेल्या प्रशासनाला कंटाळून गेल्या १० वर्षांपासून ग्रामीण रुग्णालयात बालकांना सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी नुकताच राजीनामा दिला असल्याची माहिती आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष आणि स्थानिक अधिकाऱ्याचे अयोग्य नियोजन आदी कारणाने या रुग्णालयाचे तीनतेरा वाजताना दिसते आहे. सामान्य कुटुंबातील बालकांना मोफत उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी राजीनामा दिल्याने बालकांची चांगलीच गैरसोय होणार आहे. आयुष्य विभागात होमिओपॅथी, आयुर्वेदिक औषधे नाहीत. तर खोकल्यावर लागणारी औषधे रुग्णालयात उपलब्ध नाहीत. परिणामी  रुग्णांना शासकीय सोयी सुविधा मिळत नसल्याने वणीचे रुग्णालय गैरसोयीचे माहेरघर बनले आहे.

शासकीय इमारतीवर इतरांचा ताबा...
वणी ग्रामीण रुग्णालयात असलेली इमारत पाणी तपासणीसाठी देण्यात आली आहे. मात्र येथे कार्यरत असलेले जागा मिळेल तिथे आपले बस्तान मांडत आहे. निवासस्थाने शासकीय कर्मचाऱ्यांना न देता कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात आली आहे. अतिदक्षता सेवा देणारे किरयाच्या घरात वास्तव करतांना दिसते आहे.  पाणी तपासणीसाठी देण्यात आलेल्या इमारतीचा किराया रक्कम रुग्णालयाला किती प्राप्त झाली हे गुलदस्त्यातच आहे.

Post a Comment

0 Comments