कुजलेल्या अवस्थेत पोत्यामध्ये आढळला तरुणाचा मृतदेह......

रविनगर भागातील घरात आढळला तरुणाचा कुजलेला मृतदेह....
वणी(यवतमाळ) रवि ढुमणे
शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या रविनगर भागातील एका घराच्या वरच्या माळ्यावरील खोलीत अंदाजे २५ वयोगटातील युवकाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोत्यामध्ये गुंडाळून आढळल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. तूर्तास पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी वणीच्या ग्रामीण रुग्णालयात हलविला आहे. 
सध्या वणी शहरात एकापाठोपाठ एक घटना घडत आहेत. मारेगाव येथील तरुणाचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेची शाई वाळते न वाळते तोच, रविनगर भागातील अनिल आसुटकर यांचे घराच्या वरच्या माळ्यावरील खोलीत एका तरुणाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत पोत्यात गुंडाळून आढळला आहे.
शेतकरी असलेल्या आसुटकर कुटुंबातील सदस्य दररोज शेतात जातात. घरी वयोवृद्ध असलेले वडील असतात. खालच्या भागात संपूर्ण कुटुंब राहते,तर वरच्या माळ्यावरील खोली आठ ते दहा दिवसांपूर्वी किरायाने दिली असल्याचे सांगण्यात आले आहे. मंगळवारी कुटुंबातील लोकांना दुर्गंधी जाणवायला लागली होती. याबाबत शोधाशोध केली असता सदर दुर्गंधी वरच्या भागातून येत असल्याचे दिसून येतात तिकडे जाऊन बघितले असता पोत्यामध्ये मृतदेह दिसून आला. या घटनेची माहिती वणी पोलिसांना देताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक,ठाणेदार वैभव जाधव, सहायक पोलिस निरीक्षक माया चाटसे पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, डीबी पथक, वणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. घटनास्थळ पंचनामा,पोलिसांनी सुरू केला होता. मात्र मृतकाची ओळख पटली नव्हती. तरीसुद्धा काही बारकावे बघून अधिकाऱ्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविली होती. सदर तरुणाचा मृत्यू चार दिवसांपूर्वी झाला असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. सदर तरुणाच्या मृत्यूचे कारण जरी अस्पष्ट असले तरी वणी पोलीस वेगाने तपास करीत आहेत. मृतक हा स्थानिक नसल्याचे सांगण्यात येत आहे. सध्यातरी मृत तरुणाचा मृत्यू कसा झाला. पोत्यात मृतदेह कोणी गुंडाळून ठेवला. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत. लवकरच या घटनेचा सोक्षमोक्ष लागणार असल्याची  चिन्हे दिसायला लागली आहे. एका महिन्याच्या कालावधीत ही तिसरी घटना घडली आहे.

Post a Comment

0 Comments